पुणे(प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडीतील बरळ यांनी बारा वर्षांपूर्वी अडीच एकरात जांभळाची बाग लावली . मागील वर्षापर्यंत पुणे, मुंबई तसेच इतर बाजारात त्यांची जांभळं ७० ते १४० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. मात्र बरळ यांची बीएससी ऍग्री झालेली उच्चशिक्षित मुलं अविनाश आणि अमर यांच्या नवकल्पनेतून ॲमेझॉन आणि बिग बास्केटशी करार करून ऑनलाइनद्वारे जांभळं विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २२० ते २८० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. या वेगळ्या संकल्पनेमुळे बाजारपेठेमुळे बरळ कुटुंबीला चांगला नफा होत आहे.
जांभूळ हे नाशवंत पीक असते.ते अधिक काळ टिकत नाही. ही फळं लवकरात लवकर बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात. या गोष्टीचा विचार करून महादेव बरळ यांच्या उच्चशिक्षित मुलांनी आपली जांभळं ऑनलाइन विक्रीचा निर्णय घेऊन अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं आहे
महादेव बरळ यांची कचरवाडीत १७ एकर जमीन आहे. या शेतीत त्यांनी डाळिंब, पेरू, शेवगा, जांभळ, कलिंगड आशी विविध प्रकारच्या फळबागा त्यांनी घेतल्या आहेत. बरळ यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांच्या मार्गदर्शनातून १३ वर्षांपूर्वी कोकण बहाडवी जातीच्या जांभळाची झाडं आणून त्याची लागवड केली. मागील बारा वर्षांपासून ते जांभळाचं उत्पादन घेत आहेत.
यंदा त्यांनी आतापर्यंत जवळपास 6 टन जांभळांची विक्री केली आहे. त्यापैकी 2 टन जांभळं त्यांनी ॲमेझॉन आणि बिग बास्केट अश्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विक्री केली आहे. महादेव बरळ यांनी ॲमेझॉन कंपनी बरोबर करार करून त्यामार्फत आपल्या मधाळ जांभळांची विक्री सुरू केली आहे. या प्लॅटफॉर्मवर त्यांना २२० ते २८० प्रति किलो दर मिळत आहे. पुणे-मुंबई सारख्या पारंपारिक बाजारपेठेत याच जांभळांना ७० ते १४० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
महादेव बरळ यांनी त्यांच्या अडीच एकर जांभळाच्या बागेतून आतापर्यंत ११ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. अद्यापही बागेत फळं असून त्यातून ३ लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. यावर्षीपासून त्यांनी ऑनलाईन विक्री चालू केल्याने त्यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न मिळाल्याचं बरळ यांनी सांगितलं.
जांभूळ उत्पादक शेतकरी महादेव बरळ
