आळेफाटा,दि.(प्रतिनिधी): संत सावता माळी युवक संघ जुन्नर तालुका व यशोदीप पब्लिकेशन्स पुणे द्वारा प्रकाशित ह.भ.प. विशाल महाराज गडगे, संदीप वाघोले, प्रा.विजय लोंढे यांनी संपादन केलेल्या ‘संत सावता दर्शन व महात्मा फुले काव्यदर्पण’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुदाम महाराज बनकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
विशाल महाराज गडगे यांनी आपल्या प्रास्ताविकात, ‘संत सावता दर्शन , महात्मा फुले काव्यदर्पण’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी-कवयित्री यांनी संत सावता महाराज व महात्मा फुले यांच्या जीवन, कार्य व विचार शब्दबध्द करण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय असून वाचकांना दिशा देणारा आहे असे सांगितले.
संत-समाजसुधारकांच्या विचारांनी समृध्द होण्यासाठी दोन्ही काव्यसंग्रह महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास यावेळी माजी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी व्यक्त केला.
अनिलतात्या मेहेर यांनी महाराष्ट्रातील नामवंत कवींना प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या पुस्तकरुपाने एका व्यासपीठावर आणण्याचे संत सावता माळी युवक संघाचे काम कौतुकास्पद असून समाजाने समृध्द विचारांचा वारसा जोपासावा, असे मत व्यक्त केले.
समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वांनी तो चित्रपटगृहात जावून पहावा,असे आवाहन लोकनेते सचिनभाऊ गुलदगड यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी संत सावतामाळी युवक संघ संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड,प्रदेशाध्यक्षा अनुराधा गडगे, आंबेगाव गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, संत सावता माळी युवक संघ जुन्नर तालुकाध्यक्ष संजय लक्ष्मण शिंदे, मनोज शिंदे,अर्चना विधाटे, महात्मा फुले विचारमंच अध्यक्ष सचिन वऱ्हाडी, आत्माराम संते, नंदा मंडलिक, प्रभाकर महाराज फुलसुंदर, संदिप नाईक,रामदास वऱ्हाडी, माजी जि.प.सदस्य प्रसन्न डोके, अशोक गडगे, लेण्याद्री देवस्थान अध्यक्ष संजय ढेकणे, ज्येष्ठ अभिनेते सुरेश डोळस, डॉ.पुष्पलता शिंदे, प्रमिला शिंदे, वासुदेव जंबूकर उद्योजक शंकर गडगे, समता परिषद जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ, प्रविण शिंदे, जितेंद्र बिडवई, दत्ता म्हस्के, ॲड.भानुदास गडगे, निलेश बनकर, सुखदेव गडगे, संतोष गडगे,नितीन घोडेकर, ग्रा.पं.सदस्य बारकू गडगे,शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, विशाल भुजबळ, मंगेश मेहेर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले तर आभार लक्ष्मण मंडलिक सर यांनी मानले.