पुणे,दि.(प्रतिनिधी)सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्यावतीने आज नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखणा माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती मोहिमेचे नेते ए्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.
आदल्यादिवशी माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वांद्रे गावाजवळील नंदिकेश्वराचा मंदिरात सर्व टीम पोहोचली. आज सकाळी लवकरच गिर्यारोहक चमु सुळक्याच्या पायथ्याशी पोहचले. निसर्ग देवतेचे व सुळक्याच्या पूजन करून सकाळी ९.५० वाजता चढाईस सर्वात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन नेता श्रीहरी तापकीर यांच्या व मार्गदर्शनाखाली सुरू झाले. सर्वप्रथम शरद पवळे याने चढाईस सुरुवात केली त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) सत्यवान शिरसाट देत होता. अंगावर येणारी ९०° अंशतील खडी चढाई करत शरद आणि सत्यवान यांनी सुमारे ८० फुटापर्यंत दोन स्टेशन पर्यंत सुरक्षित चढाई केली. या नंतर अनिल पवळे याने सरळसोट कातळ भिंतीचा अवघड टप्पा यशस्वीपणे चढाई करत तिसरे स्टेशन गाठले. तेथून पुढे सर्वात आव्हानात्मक ओव्हरहँग ची चढाई पुन्हा एकदा शरद याने अतिशय कौशल्याने पार केले व चौथे स्टेशन गाठले. आता सुळक्याचा माथा केवळ ३० फूट अंतरावर होता परंतु तिथे माती युक्त खडकातील घसरडा व अतिशय निसरडा चढाई मार्ग होता. शरद पवळे व सत्यवान शिरसाट यांनी या टप्प्यात सुरक्षित चढाई करत दुपारी १.०० वाजता सुळक्याचा माथा गाठला व ‘ जय भवानी जय शिवाजी, व ‘ हर हर महादेव’ अश्या घोषणा दिल्या.
यानंतर अनिल पवळे, हृषिकेश देवकर, प्रकाश ढमाले व राजेश जाधव यांनी सुळक्याच्या माथा गाठला. या सर्वांना सुरक्षित पणे चढाई करत असताना पहिल्या दोन स्टेशन पर्यंत पृथ्वीराज बोऱ्हाडे व अक्षय हत्त्ते यांनी चढाई केली. यांना पांडुरंग शिंदे यांनी तांत्रिक साहित्य नियोजन व बेस कॅम्प नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पडली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने वजीर सुळक्यावर आरोहण मोहिम यशस्वी करताना सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
या मोहिमेचे नेतृत्व मोहिमेचे नेते एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे यांचे मार्गदर्शन लाभले.