बेल्हे,दि.(प्रतिनिधी)एका अनोळखी वृद्धाला दिलेली लिप्ट दुचाकीस्वराला चांगलीच महागात पडली.अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दुचाकीस्वराला अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने लुटले गेल्याची घटना रविवारी रात्री साडे आठ वाजता कल्याण-अहमदनगर महामार्गावर बेल्हे बाह्यवळण रस्त्यावर घडली.
याघटनेविषयी आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.
याबाबत बेल्हे ग्रामस्थ व आळेफाटा पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्याकडून समजलेली हकीकत अशी, मुंबई सानपाडा येथे नोकरीस असलेले बेल्हे बांगरवाडीचे विशाल गोरक्षनाथ रोकडे हे त्यांच्या दुचाकीने आळेफाटा कडून बेल्हे मार्गे घरी परतत होते.बेल्हे गावच्या हद्दीत टेंभी नाकाजवळ एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे लिप्ट मागितली,त्यांना दुचाकीवर घेतल्यानंतर अवघ्या पाचशे मीटर अंतरावर त्यांना उतरायचे म्हणाले,दुचाकी थांबताच बांगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला तीन अज्ञात इसम यांनी मला पकडून माझे तोंड दाबून मला रस्त्याच्या कडेला आत मध्ये नेऊन माझ्या गळ्यातील सोन्याची चैन व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी असा दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेऊन शेतातून डोंगराच्या दिशेने पळून गेले अशी फिर्याद दुचाकीस्वार विशाल गोरक्षनाथ रोकडे यांनी दिली.
आळेफाटा पोलीस ठाण्यात रोकडे यांनी फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहेत.