नासा व इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेल्या जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार

जुन्नर,दि.२३(प्रतिनिधी) : जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांचा तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था (नासा) व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथील अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे.

संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी साईराज पवार (आळेफाटा) याची तर इस्रोला भेट देण्यासाठी प्रणव गोरक्षनाथ कडाळे (तेजूर ठाकरवाडी), श्रावणी सूर्यकांत सुपे (राजूर नं. १), ऋतुजा अशोक जमदार (गोळेगाव), ध्रुव बबन खोकराळे (हिवरे तर्फे नारायणगाव), अन्वित संदीप ताजणे (आळेफाटा), रिनाज गुलमस्तफा पिंजारी (आळेफाटा), डावखर कृष्णा तुषार (शिरोली बोरी) यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील असून त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

संघाचे सचिव प्रकाश जोंधळे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर झेप घेतल्याचे हे अभिमानास्पद उदाहरण आहे. त्यांचा उत्साह वाढावा यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.”

यावेळी तालुक्यात पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे माजी सैनिक रमेश खरमाळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. “पर्यावरण संवर्धनासाठी गावोगाव जनजागृतीचे काम करून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे,” असे खजिनदार व्यंकट मुंढे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तबाजी वागदरे, तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, सचिव प्रकाश जोंधळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, प्रशांत शेटे, खजिनदार व्यंकट मुंढे, तालुका समन्वयक योगेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.