बिबट्याचा बेल्ह्यात धुमाकूळ…!

बेल्हे(प्रतिनिधी)मानवी वस्तीत बिबट्या आल्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना,अनुभव,बातम्या आपण वृत्तपत्रांतून नेहमीच वाचतो;पण रात्री घरात तुम्ही झोपलेले आहात,अशा वेळी बिबट्यानी फोडले ल्या डरकाळीने चक्क तुमची झोप मोड केली तर… ही काही कपोलकल्पित कथा किंवा कल्पना नाही,तर बेल्हे गावात काल(शुक्रवारी)रात्री घराच्या ओट्यावर ठाण मांडून बसलेल्या बिबट्याने,अख्या बेल्हे गावात गंजीतील ग्रामस्थांना पुरते हैराण करून सोडले.

बेल्हे गावात बसस्थानकाजवळ गंजीवस्ती आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने,वस्तीवरील ग्रामस्थ घरात झोपतात.काल(शुक्रवारी)शेतकरी ग्रामस्थ नेहमी प्रमाणे रात्री झोपण्याच्या तयारीत होते,बिबट्यानी डरकाळया मारण्यास सुरुवात केली.अंजली भुजबळ,तेजल अजिंक्य भुजबळ या घराबाहेर आले,पाहता तर बिबटया मस्तपैकी फिरत होता,काही वेळाने त्या बिबट्याने वस्तीवरील घराभोवती डरकाळी फोडत गस्त सुरू केली.काही वेळाने बऱ्यापैकी ग्रामस्थ झोपेतून उठले, त्यावेळी त्यांना ओट्यावर काही अंतरावर बिबट्या बसलेला दिसला,त्यांनी आरडा-ओरडा करीत परिसरातल्या ग्रामस्थांना मदतीला बोलाविले, ग्रामस्थ मदतीला धावले,पण बिबट्या पळून जाण्याऐवजी डरकाळ्या फोडू लागला.काही ग्रामस्थांनी फटाके फोडले,तरीही बिबट्या जागचा हलला नाही.वस्तीवरील ग्रामस्थाची जशी संख्या वाढली तशा बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या,काही ग्रामस्थांनी बॅटरीच्या लाईट त्याच्यावर फोकस केल्या,तरीही बिबट्या कोठेही हलला नाही,तब्बल दोन तासाने बिबट्याने,ग्रामस्थाच्या गर्दीच्या दिशेने झेपावत लगतच्या झाडीत धूम ठोकली. बिबट्याने गर्दीत झेप घेतली,त्यावेळी ग्रामस्थांची अवस्था काय झाली असेल,हे न विचारलेले बरे,असे ॲड.अनिकेत भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान रात्री बिबट्याने घातलेल्या धुमाकूळाने,गंजीवस्ती वरील ग्रामस्थ पुर्णपणे धास्तावलेले असून परिसरात एखादी मानवी हल्ल्याची दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने, पुढाकार घेऊन बिबट्याच्या बंदोवस्तासाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.