कारवाईच्या भीतीने चोरीला गेलेल्या गौणखनिज थोड्या प्रमाणात परत जाग्यावर…!

बेल्हे(प्रतिनिधी)बेल्हे गावच्या सार्वजनिक विहीर खोलीकरणात काढलेले गौणखनिज गायब झाल्याचा प्रकार जागृत ग्रामस्थांनी ग्रामसभेत उघडकीस आणून कारवाईची मागणी केली.याविषयी प्रसार माध्यमातून आवाज उठताच कारवाईच्या भीतीने चोरट्यांनी चोरलेल्या गौणखनिजातले काही गौणखनिज रात्रीच्यावेळी परत सार्वजनिक विहिरीजवळ येऊन पडले.

बेल्हे गावच्या सार्वजनिक विहीरीचे विनापरवाना खोली करण करणे,गौणखनिज गायब करणे,चोरलेल्या गौणखनिजातील काही गौणखनिज परत जाग्यावर आले  या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर खातेनिहाय चौकशी व्हावी,यात दोषी असलेल्या ग्रामसेवक एमबी दुराफे यांच्यासह चोरी करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

बेल्हे गावच्या पाणीसाठा वाढावा म्हणून बारा लाख रुपये खर्च करून सार्वजनिक विहिरीचे सोळा फूट खोलीकरण काम केले,यात मोठ्या प्रमाणात गौणखनिज(डबर) काढण्यात आले.ते गौणखनिज रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर,ट्रक मध्ये भरून गायब करण्यात आले.याबाबत वृत्त प्रसिध्द होताच पोलिसांच्या फौजदारी कारवाई भीतीने आणि चोरी उघडकीस येण्याच्या भीतीने त्यातील तीन हायवा डबर गौणखनिज रात्रीच्या अकरानंतर परत विहिरीजवळ टाकण्यात आले असे ग्रामस्थांनी सांगितले.

संबंधित चोरट्यांनी हे चोरलेले गौणखनिज त्यांनी मानलेल्या गुरू समर्थ चरणी अर्पण केले होते,एक हायवा ट्रक गौणखनिज स्वतःच्या प्रभागातील एका मळ्यात साठवण केली होती पण आपल्या चोरीबरोबर आपल्या गुरुचे प्रताप उघडे होतील याभितीने चोरलेल्या गौणखनिजातील काही गौणखनिज पुन्हा जाग्यावर आणून टाकले असल्याची उलटसुलट चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

विहिरीत सोळा फूट खोलीकरणात किती गौणखनिज ब्रास गौणखनिज काढण्यात आले,त्या गौणखनिज उत्खननासाठी वापरण्यात आलेल्या बालकर्मचारी,स्फोटके याला महसूल विभागाच्या संबंधित कार्यालयाची परवानगी घेतली होती का ? त्या गौणखनिजाची किती रॉयल्टी दिली ?त्या गौणखनिज विक्रीतून बेल्हे ग्रामपंचायतच्या बॅंक खात्यात किती रुपये जमा झाले ? त्याच बरोबर कोंबरवाडी,यादववाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या खोदकामातील गौणखनिज कोठे गेले,त्यासाठी महसूल विभागाच्या गौणखनिज अधिकाऱ्यांची परवानगी होती का? या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी.

बेल्हे गावच्या तसेच यादववाडी,कोंबरवाडी सार्वजनिक विहिरीतून खोलीकरणातून काढण्यात आलेल्या संपूर्ण गौणखनिज चोरी प्रकरणाची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यां मार्फत खातेनिहाय चौकशी करून या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीवर फौंजदारी गुन्हा दाखल करून दोषींना पदमुक्त करावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान बेल्हे ग्रामपंचायतच्यावतीने सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण करून काढलेल्या गौणखनिज गायब झालेल्या आणि परत जाग्यावर आणून टाकणाऱ्या  महाशयांची ग्रामस्थांमध्ये रंगतदार चर्चा सुरू आहे.