आर्वी : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.मुरलीधर डोंगरे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मीना डोंगरे यांनी एक लाख रुपयांचा इंटरॅक्टीव्ह पॅनेल भेट दिला.
आपल्या शाळेप्रती आगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या डोंगरे दांपत्याने गेल्याच वर्षी शिवाजी विद्यापीठातील महिला वसतिगृहाच्या उभारणीसाठी साडेसहा लाख रुपयांची देणगी दिली होती.ग्रामीण भागात शिक्षण घेत खडतर प्रवास करून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या डॉ.डोंगरे यांनी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांद्वारे शिक्षण मिळाले पाहीजे या हेतूने ही भेट शाळेला दिली.
पत्रकार धर्मेंद्र कोरे यांच्या हस्ते या इंटरॅक्टीव्ह पॅनेलचे उद्घाटन करण्यात आले.सरपंच भावेश डोंगरे,माजी विद्यार्थी केरभाऊ डोंगरे,शांताराम डोंगरे,रामदास सरोदे यांच्या उपस्थितीत हा इंटरॅक्टीव्ह पॅनेल शाळार्पण सोहळा पार पडला.
डॉ.मुरलीधर डोंगरे हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.तर त्यांच्या पत्नी डॉ.मिना डोंगरे या विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. या दांपत्याने विविध गरजू विद्यार्थ्यांना अनेकदा शैक्षणिक मदतीचा हात पुढे करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रास्तविक आर्वी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक दत्ता रोकडे यांनी केले.