डिसेंट फाउंडेशन तर्फे साकोरी येथील विद्यालयात “कळी उमलताना” उपक्रम

बेल्हे(प्रतिनिधी)साकोरी(ता.जुन्नर)येथे,किशोरवयीन मुलींसाठी विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी,पी एम हायस्कूल,ज्युनियर कॉलेजमध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियानांतर्गत”कळी उमलताना”हा कार्यक्रम घेण्यात आला.

मुलींनी मासिक पाळीबाबतच्या शंका असल्यास आपल्या आईशी,शिक्षिकेशी डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.या वयात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेऊन जर काही त्रास होत असेल तर त्याविषयी निसंकोच पणे बोलले पाहिजे.मासिक पाळी हे एक नैसर्गिक घटना चक्र आहे त्याला अपवित्र मानू नये असे आवाहन डॉ.पूजा गायकवाड यांनी केले.

मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी,पर्या वरण पूरक सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा,त्याची विल्हेवाट कशी लावावी,या काळात आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा याबाबतही डॉ.गायकवाड यांनी मुलींना मार्गदर्शन केले.

मोबाईलचा योग्य वापर करा हे सांगताना डॉ.फकीर आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर  मार्गदर्शन केले.आई-वडील आपले दैवत आहेत,त्यांच्याशी संवाद ठेवा,चांगली संगत करा असे आवाहन केले.

डिसेंट फाउंडेशनने पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीन मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून, त्यांना मोफत पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड व “कळी उमलताना” या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले आहे.

याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, विद्यानिकेतन पीएम संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पी.एम. साळवे,सचिव डॉ.फकीर आतार, प्रमुख मार्गदर्शिका डॉ.संपदा तोडकर,डॉ.पूजा गायकवाड आदींसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

स्पर्शज्ञान ही स्त्रीला मिळालेली एक देणगीच आहे. समोर ची व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करते हे तिच्या लगेच लक्षात येते.परंतु लहान लहान मुलींना ते ज्ञान अवगत नसल्यामुळे कुटुंबात,शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा.एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूने सलगी करते हेही लक्षात घ्या असा सल्ला डॉ.संपदा तोडकर यांनी दिला.

यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन.सोनवणे यांनी केले तर आभार प्रतिभा गाडगे यांनी मानले.