नारायणगाव(प्रतिनिधी)चाकूचा धाक दाखवून शेतकरी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ग्रामीण पोलिसांना यश आले.
पारगाव तर्फे आळे येथील भामाबाई बाबाजी येवले(वय ६१ वर्षे)या कावळ पिंपरी गावच्या हद्दीत शेतात जनावरे चारत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.हा गुन्हा नारायणगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पोलिस पथकाने सीसीटीव्ही पुटेजसह इतर माहितीच्या आधारे सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे(वय-२४ वर्षे)प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे(वय-१९ वर्षे)अनिकेत रमेश सरोदे( वय २० वर्षे,सर्व रा.बजरंगवाडी,शिक्रापूर,ता.शिरुर,जि. पुणे)यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरलेले दागिने अमोल एकनाथ पेटारे (वय २९ वर्षे,रा.बजरंगवाडी ता.शिरुर जि.पुणे)याला दिल्याचे सांगितले.
दरम्यान या टोळीने जुलै महिन्यात शिरूर तालुक्यातील उरळगाव शिवारात अशाच पद्धतीने वृद्ध महिलेला लुटल्याचेही निष्पन्न झाले.या आरोपीनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकलसह चोरलेले सोन्याचे दागिने संशयित आरोपी अभिषेक सुभाष पिटेकर(रा.बुरुंजवाडी शिक्रापुर,ता.शिरुर जि.पुणे)याच्याकडून हस्तगत करून आरोपींना पोलिसांनी अटक केली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कस्टडी दिली असून पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.
या पोलीस पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस हवालदार तुषार पंदारे,दिपक साबळे, जर्नाधन शेळके,संजु जाधव,संदीप वारे,अक्षय नवले,अतुल डेरे,राजू मोमीण,सागर धुमाळ,निलेश सुपेकर यांनी कामगिरी बजावली.