कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक वादाची उच्च न्यायालयात २१ ऑक्टोबरला सुनावणी

बेल्हे(प्रतिनिधी)कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक वादाची उच्च न्यायालयात २१ ऑक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आल्याची नोटीस वादी-प्रतिवादीना बजावली आहे.

अहमदनगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कोरठण खंडोबा देवस्थानच्या २३ सप्टेंबर २०२२ ला केलेल्या विश्वस्त मंडळाचे नियुक्तीच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिकेवर २६ ऑगस्ट २०२४ रोजी सुनावणी होऊन न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस जारी करून पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.

विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी देवस्थानचे मानकरी,पुरातन मंदिराचे मूळ निर्माणकर्ते,त्यांचे वारस यापैकी कोणालाही विश्वस्त पदावर निवड केले नाही.दबावाखाली नियमबाह्यपणे विश्वस्तांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या असा आक्षेप घेऊन धर्मादाय आयुक्तांच्या विश्वस्त नेमणूकविरुद्ध संकल्प विश्वासराव (बेल्हे),सौ सुमन जगताप,राहुल पुंडे, योगेश पुंडे या भाविक भक्तांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जुलै २०२३ मध्ये याचिका दाखल केली.

२६ ऑगस्ट २०२४ रोजी न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांचे खंडपीठापुढे याचिका सुनावनीला आली.याचिकाकर्तेच्या वतीने ॲड.व्ही.पी.पाटील यांनी बाजु मांडली.प्रतिवादी विधी व न्याय विभाग प्रधान सचिव आणि अहमदनगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तच्यावतीने सहाय्यक सरकारी विधीज्ञ के.एन.लोखंडे यांनी म्हणणे मांडले.

न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांचे खंडपीठाने वादी-प्रतिवादीना नोटीसा देऊन पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर २०२४ ला ठेवली असल्याचे कळविले आहे.या सुनावणी कडे पुणे अहमदनगर जिल्ह्यातील खंडोबा भक्तांचे लक्ष लागले आहे.