आळेफाटा(प्रतिनिधी)पहाटे मेंढपाळाच्या पालात शिरलेल्या दोन पैकी एका बिबट्याने झोपलेल्या महिलेवर हल्ला केला. त्यात महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ओतूर येथील वाघदरा शिवारात घडली.
या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव मीराबाई बिरु बरकडे(वय ४६ वर्ष,रा.वनकुटे,ता.पारनेर,जि.अहिल्यानगर) असे नाव आहे.
ओतूर(ता.जुन्नर)येथील अंबादास सुंदर डुंबरे यांच्या वाघदरा शिवारात असलेल्या शेतात मेंढपाळ बिरु बरकडे यांचा १५० बकरांचा वाडा आहे.या वाड्यातील वाघुराच्या आत ठेवलेल्या बकरांना सावज बनविण्यासाठी दोन बिबट्यांनी प्रयत्न केला,पण प्रयत्न असफल झाल्यानंतर बिबट्यांनी आपला मोर्चा वाड्यालगत असलेल्या मेंढपाळाच्या पालाकडे वळवला.
पालात शिरलेल्या दोन पैकी एका बिबट्याने झोपलेल्या मीराबाई बरकडे यांच्यावर हल्ला चढवला,सुदैवाने त्यांचा मुलगा आणि अकरा महिन्याचा नातू बचावले.आरडाओरडा करून परिसरातील ग्रामस्थांना अमोल बिरु बरकडे या त्यांच्या मुलाने मदतीला बोलाविले,ग्रामस्थ मदतीला धावताच दोन्ही बिबट्यांनी लगतच्या ऊसाच्या फडात धूम ठोकली.या हल्ल्यात मीराबाई गंभीररीत्या जखमी झाल्या.त्यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.