बेल्हे(प्रतिनिधी)बेल्हे शिवारातील पिंपळगावजोगा कालव्यालगतच्या रस्त्यावर बुधवारी सकाळी मुरूम तस्कराने महसूल विभागाच्या पथकावर थेट हल्ला चढवला. तस्कराने ट्रकमधील मुरूम महसूल पथकाच्या वाहनांवर ओतत पलायन केलं. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी महसूल विभागाच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्हे मंडलाधिकारी योगिता पिंगळे, बेल्हेचे तलाठी मिलिंद महानवर तसेच आणे व गुंजाळवाडी येथील तलाठी महसूल पथकात सहभागी होते. सकाळच्या सुमारास या पथकाने अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या ट्रकचा पाठलाग सुरू केला असता, संबंधित ट्रकचालकाने ट्रक थांबवण्याऐवजी ट्रकमधील मुरूम थेट महसूल पथकाच्या वाहनांवर ओतून अडथळा निर्माण केला आणि त्या गोंधळात घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकारामुळे महसूल विभागाच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून,आरोपी तस्कर ट्रकसह पसार झाला.या प्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
आळेफाटा पोलीस त्या मुरूम तस्करासह ट्रकचा तपास करत असून, संबंधित तस्कराला लवकरच अटक करण्यात येईल,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.