९५ वर्षीय आजोबांच्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा; ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी, १०० टक्के सोन्याचे दागिने जप्त

ओतुर:-जुन्नर तालुक्यातील नेतवड कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या घरफोडीचा छडा लावत ओतूर पोलिसांनी आरोपीला अटक करून तब्बल ४ लाख २० हजार रुपयांचे सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे नेतवड कुटेमळा (ता. जुन्नर) येथील बजाबा महादू कुटे (वय ९५) यांनी पत्नीचे जपून ठेवलेले सोन्याचे दागिने घराच्या पोटमाळ्यातील पेटीत ठेवले होते. दिनांक १ मे ते ७ मे २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पेटीचा कडी-कोयंडा तोडत सुमारे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये मनीमंगळसूत्र, सोन्याची पाने, पुतळा, नथ आणि सोन्याच्या पेट्या असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे (वय ५६) यांनी ११ मे रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयित अभिषेक खंडू कुटे (वय ३२, सध्या रा. टिटवाळा, जि. ठाणे, मूळ रा. नेतवड कुटेमळा) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले. विशेष म्हणजे, चोरीतील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईनंतर वृद्ध फिर्यादी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ओतूर पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, नागरिकांनी मौल्यवान दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावांमध्ये अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार बाळशिराम भवारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश उकिर्डे यांनी यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *