श्रद्धेवर डल्ला टाकणारी टोळी अखेर जेरबंद ! मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊनच चोरले मंगळसूत्र; लाल बुटाच्या धाग्याने आळेफाटा पोलिसांनी उकलला थरार

बेल्हे:-ऐन लग्नसराईत साऊंड सिस्टिमवर डल्ला मारणाऱ्या तसेच बेल्हे गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताबाई माता मंदिरात चोरी करून पसार झालेल्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला आळेफाटा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.मंदिर चोरीपासून साऊंड सिस्टिम, डीजे साहित्य आणि एलईडी टीव्ही चोरीपर्यंतच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या टोळीने बेल्हे येथील मुक्ताबाई मंदिरात चोरी करण्यापूर्वी अत्यंत चलाखीने रेकी केली होती.मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास करून ज्या खिडकीला ग्रील नव्हते,तीच खिडकी त्यांनी प्रवेशासाठी निवडली.रात्रीच्या अंधारात त्या खिडकीतून मंदिरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी आधी देवीचे दर्शन घेतले,देवीच्या पाया पडले आणि त्यानंतरच देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले.विशेष म्हणजे,चोरीच्या वेळी आरोपीच्या पायात असलेल्या लाल रंगाच्या शूजचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच आधारे तपासाची दिशा निश्चित झाली.

मुक्ताबाई देवीचे मंगळसूत्र जरी ‘बेन्टेक्स’चे असले तरी, लाखो भाविकांच्या श्रद्धेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची भावना परिसरात व्यक्त होत होती.ही बाब आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या जिव्हारी लागली.त्यांनी गुन्हे शोध पथकाला कसून तपासाच्या सूचना दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषण,गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले.

या प्रकरणाची सुरुवात निमसेमळा-संतवाडी येथील विजय शरद फापाळे यांच्या टाटा ७०९ टेम्पोमधून ब्रिटीश कंपनीचे दोन एम्प्लिफायर चोरीला गेल्यानंतर झाली होती. या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तुकाराम पोपट कातोरे (सध्या रा.कळंब,ता.आंबेगाव,मूळ रा.जांबुत बु.,ता.संगमनेर), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ आणि अजय किसन मेंगाळ (दोघे रा.जांबुत बु.,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर)यांना ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी बेल्हे येथील मुक्ताबाई मंदिरातील चोरीची कबुली दिली.आळेफाटा, ओतूर आणि घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इतर चोरीचे गुन्हेदेखील उघडकीस आले.या टोळीकडून ब्रिटीश कंपनीचे दोन एम्प्लिफायर,एनएक्स ऑडिओ आरएक्स मशिन,एन लॅब एक्स एम्प्लिफायर,पिंटो स्पीच प्लेअर,फोर चॅनल मिक्सर,डीबीएक्स क्रॉस ओव्हर,पायनर कंपनीचे सीडीजे प्लेयर,एलईडी टीव्ही,देवीचे मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश टाव्हरे,सहाय्यक फौजदार राजेंद्र हिले, भिमा लोंढे,विनोद गायकवाड,पंकज पारखे,अमित मालुंजे, नवीन अरगडे,ओंकार खुणे,गणेश जगताप,प्रशांत तांगडकर,सखाराम जुंबड यांच्या पथकाने केली.

दरम्यान, मंदिर चोरीसह अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद केल्याबद्दल बेल्हे ग्रामस्थांनी आळेफाटा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *