पारनेर(श्रीकांत चौरे): पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटत आले तरी नगर जिल्ह्यात अद्यापही पाऊस झालेला नसल्याने पारनेर-नगर मतदारसंघात जनावरांचा चारा तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने तात्काळ चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करून वाढीव टँकर सुरू करण्याची मागणी आ. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात नमुद करण्यात आले आहे की, पाऊस नसल्याने पारनेर-नगर मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पाण्याचे स्त्रोत आटल्याने विविध गावांमधून पिण्याच्या पाण्याचे वाढीव टँकर तसेच पशुधनासाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी वाढत आहे. पशुधनासाठी चारा उपलब्ध नसल्याने पशुधन जगवायचे कसे याचा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्तरावरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना पारनेर-नगर मतदारसंघात पशुधनासाठी चारा डेपो, चारा छावण्या तसेच नागरिकांसाठी तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव टँकर सुरू करण्यासाठी आदेशित करण्याची विनंती आ. लंके यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील विविध गावांना टँकरद्वारे ज्या मांडओहळ प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत होता, त्या मांडओहळ प्रकल्पानेही तळ गाठला असून पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी नवा स्त्रोत शोधावा लागणार आहे.