पारनेर प्रतिनिधी(श्रीकांत चौरे): आरोग्यदायी गांव म्हणुन नावारूपाला आलेल्या नगर तालुक्यातील जखणगांवमध्ये अभीनव असा श्रावणोत्सव व शिक्षण महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.
गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पुर्वी श्रावणामध्ये महिनाभर गावात विविध पारंपारीक आनंददायी व आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येत होते.
काळाच्या ओघात ही परंपरा लुप्त झाली.
परंतु त्यामुळे समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले. ही परंपरा पुन्हा प्रस्थापित व्हावी या हेतुने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील सर्व नवविवाहित मुली व सुना यांच्या मंगळागौरी पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे पौरोहित्य विजयकुमार गंधे यांनी केले.
या सर्व साक्षात गौरींना ग्रामपंचायत च्या वतीने शालु भेट म्हणुन देण्यात आले.
नगरमधील प्रसिद्ध सुवर्णाताई मिरीकर व महिला मंडळ यांच्या वतीने श्रावणोत्सव संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
नृत्य, फेर,गायन,नाटीका,गवळणी, भारूड अशा विविध भरगच्च कार्यक्रमांनी ही मैफिल चांगलीच रंगली.
गावातील महिला व शाळेतील मुलामुलींचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.
थोर समाजसेवक कै डाँ. दिगंबर शंकर गंधे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व शिक्षकदिनाचे औचित्य साधुन शिक्षण महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
यात गावातील सर्व आजीमाजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षकी पेशाचा,अभिमान जखणगांवकरांचा
हा पुरस्कार प्रमुख अतिथी पाटोद्याचे आदर्श सरपंच तथा प्रसिद्ध व्याख्याते श्री भास्करराव पेरे पाटील,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे व जखणगांवचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.
अंगणवाडी सेविकेपासुन ते प्राचार्य पदापर्यंत विविध शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ५५ शिक्षकांचा पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामविकासाठी समाजाचे योगदान या विषयावर पेरे पाटील यांचे सुश्राव्य असे व्याख्यान झाले.
विनोदी शैली, गावराण भाषा,व वास्तववादी विचार यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.
रात्री जागरापुर्वी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच डॉ. सुनिल गंधे,उपसरपंच शाबिया शेख, चेअरमन बाळासाहेब कर्डिले, ग्रामसेवक प्रवीण पानसंबळ, मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे, बाळासाहेब शहाणे, सुभाष सौदागर, संतोष जगताप, रजनी गंधे, सुनिता कर्डिले, बाळासाहेब काळे, सुरेश कार्ले, प्रगती कर्डीले, तात्या कर्डिले, रमेश आंग्रे, कुसुम गुंजाळ, कालींदी केसकर ,सुवर्णा मिरिकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले तर गिरीश कर्डिले यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला जनतेने जो अभुतपूर्व प्रतिसाद दिला त्याचीच चर्चा जिल्ह्यात होत आहे.