बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप।निमगावसावा’च्या शिवमळ्या तील घटना।दोघांवर उपचार सुरू

निमगावसावा(पंढरीनाथ मते): “काळ आला होता,पण वेळ आली नव्हती”या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव काल(दि.३) निमगावसावा(शिवमळा)परिसरातल्या ग्रामस्थानी घेतला.याबाबत ग्रामस्थांकडून समजलेली हकीकत अशी,काम रात्री उरकून शिवमळा येथील पांडुरंग निवृत्ती गाडगे,नंदाराम पोपट मते हे मोटारसायकलवरुन रस्त्याने घरी परतत होते.

त्यांच्या घराच्याजवळ काही अंतरावर असलेल्या ऊसाच्या फडातून दबा धरलेल्या बिबट्याने,त्यांना सावज बनविण्यासाठी त्यांच्या दिशेने झडप टाकण्यासाठी झेप घेतली,सुदैवाने त्या झेपचा अंदाज फसला,बिबट्याने त्यांच्या पायांवर हल्ला केला.क्षणाचाही विलंब न करता,त्यांनी मोटारसायकलवरून उडी मारली आणि मदतीसाठी आरडा-ओरडा केला.जवळच असलेले ग्रामस्थ मदतीला धावले.ते पाहून बिबट्याने सावज सोडून लगतच्या ऊसाच्या फडात धूम ठोकली.बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोघांच्याही पायाला दाताच्या जखमा झाल्या,प्राथमिक उपचारासाठी त्यांना निमगाव सावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

सुदैवाने तो हल्ला किरकोळ जखमावरच भागला.पण बिबट्याच्या हल्ल्याच्या रुपाने समोर काळ उभा राहिलेला पाहून त्या धक्क्यातून त्या सावरलेल्या नाहीत,असे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले.दरम्यान शिवमळा परिसरात असलेल्या या बिबटयाने त्यानंतर आज दुपारी रस्त्यात ठाण मांडून अनेक घरी परतणाऱ्या ग्रामस्थाचा रस्ता आडविला असल्याचे पंढरी नाथ मते यांनी सांगितले.