नारायणगाव परिसरातील बालचमू मावळ्यांनी केला गड किल्ल्याचा अभ्यास

नारायणगाव,दि.(प्रतिनिधी)नारायणगाव वारूळवाडी परिसरातील बालमित्रांसाठी रायरेश्वर किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी दिली.

रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने नारायणगाव वारूळवाडी परिसरातील बालमित्रांसाठी रायरेश्वर किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती देताना पाटे म्हणाले की,गेल्या चौदा वर्षांपासून स्वराज्य फाउंडेशन दरवर्षी बाल मित्रांसाठी एक किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करत आहे.

स्वराज्य फाउंडेशन दरवर्षी बालमित्रांना घेऊन किल्ले दर्शन घडवून गड किल्लूयांची माहिती व्हावी हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश असून दरवर्षी एक किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.

हजारो मावळ्यांनी रक्त सांडून मिळवलेले किल्ले हीच जिवंत स्मारके आहेत, हा उद्देश ठेवून अभ्यासात्मक सहलीचे नियोजन करण्यात येते.आजपर्यंत मागील १३ वर्षांमध्ये किल्ले सिंहगड,किल्ले राजगड,किल्ले दौलताबाद (देवगिरी)किल्ले लोहगड,किल्ले पुरंदर, नगरचा भुईकोट किल्ला, रायगड मधील मुरूड जंजिरा किल्ला, कात्रज प्राणी संग्रहालय, अजंठा वेरूळ लेणी तसेच एकवीरा मंदिर, तसेच प्रतिबालाजी मुलांना दाखविण्यात आले. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली तो किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर हा मुलांना दाखवण्यात आला.

या किल्ल्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिरात शपथ घेतली ते शिवमंदिर तसेच रायरेश्वर पठार, सात रंगाची माती , पांडवलेणी शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महाला यांची समाधी, तसेच स्वराज्याचे सरदार कान्होजी जेधे यांची समाधी, तसेच भोर येथील चिमणाजी नारायण पंतसचिव यांनी पेशवाईत राजवाडा हा बालमित्रांना दाखवण्यात आला सदर सहलीमध्ये ४२१ बालमित्रांनी सहभाग घेतला.