आळेफाटा : वडगांव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहारातून जीवनाचे महत्त्वाचे धडे गिरवत ‘बालविक्रेते’ म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डी.बी.(नाना) वाळुंज यांच्या संकल्पनेतून सन २०१० पासून राबविण्यात येत असलेल्या बाल आनंदी बाजार या उपक्रमांतर्गत यंदाही विद्यार्थ्यांनी गावात जणू आठवडा बाजारच भरविल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, समाजाशी एकरूप होता यावे, वस्तूंची विक्री, व्यवहार, पैशांचे महत्त्व व आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव व्हावी, या उद्देशाने गेली अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला, तसेच आई-वडिलांकडून बनवून घेतलेले विविध खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंची विक्री केली.
शनिवार-फणीवारचा मुहूर्त साधत शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा मेळावा उत्साहात पार पडला.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रोख व्यवहाराऐवजी बँकेच्या स्कॅनरद्वारे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले. बाजारातील सुट्ट्या पैशांच्या टंचाईवर मात करत आधुनिक व्यवहार पद्धतींचा यशस्वी वापर कसा करता येतो, याचा वस्तुपाठ विद्यार्थ्यांनी दाखवून दिला. सर्व शिक्षकांच्या निगराणीखाली पार पडलेल्या या उपक्रमामुळे अनेक ग्रामस्थांनी “खऱ्या अर्थाने आठवडा बाजार भरला आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला स्वच्छ व ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. तो पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यासोबतच भेळ, चहा, पोहे, वडापाव, चटपट छोले, खमंग पाणीपुरी, कस्टर्ड, व्हाईट चॉकलेट, मिल्कशेक आदी खाद्यपदार्थांनी खाऊगल्ली सजली होती. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने मुलांकडून खरेदी केली, घासाघीस केली; तर मुलांनीही सुट्टे पैसे अचूक परत देत शालेय ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग दाखवून दिला.या वर्षी बाल आनंदी बाजाराने मागील वर्षीचा विक्रम मोडीत काढत ४५ हजार रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल साधली.
या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय गंगाधर चौगुले (पोलीस पाटील), सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ डी.बी.(नाना) वाळुंज,ज्येष्ठ नागरिक हरिनाना देवकर,ग्रामपंचायत उपसरपंच गणेश भुजबळ, माजी उपसरपंच ऋषी गडगे, सदस्य संतोष पादीर, विविध कार्यकारी सोसायटी संचालक निमेश वाळुंज, ग्रामपंचायत ज्येष्ठ लिपिक तुकाराम वाळुंज, तसेच गणेश गडगे, संदेश काशीकेदार, सचिन देवकर, कैलास वाळुंज, बारकु गडगे, नवनाथ वाळुंज,निशा वाळुंज आदी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बाजाराची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करून जागा पूर्ववत केली. या उपक्रमशीलतेचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.या बाल आनंदी बाजाराच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, सदस्य डी.बी.(नाना) वाळुंज, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर तसेच सहशिक्षिका छाया डुंबरे,सुनंदा तांबे,सविता खेत्री, गीतांजली बोऱ्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.