आळेफाटा : गुंजाळवाडी(बेल्हे)ग्रामपंचायतीने जिओ कंपनीच्या सतत खंडित होणाऱ्या नेटवर्क सेवेमुळे अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे.गावातील नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जिओ कंपनीला अधिकृत पत्र पाठवत नेटवर्क सेवा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार, गावातील जिओ टॉवरची क्षमता केवळ २०० मोबाईलची असताना सध्या त्या टॉवरवर सुमारे १२०० ते १३०० मोबाईल सुरू आहेत. त्यामुळे नेटवर्कवर मोठा ताण येत असून कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद पडणे आणि वारंवार नेटवर्क गायब होण्याच्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत.
विशेष म्हणजे, महिन्यातून किमान १५ दिवस नेटवर्क सेवा विस्कळीत राहत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.मागील चार दिवसांपासून तर नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ऑनलाइन व्यवहार,विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे काम तसेच दैनंदिन संवाद यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसभेतही हा विषय चर्चेला आला असून, टॉवरची क्षमता वाढवावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.तसेच सेवा सुधारली नाही तर दुसऱ्या एखाद्या कंपनीला गावात नवीन टॉवर उभारण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.