पारनेर श्रीकांत चौरे:
विधीमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजुर करण्यात येऊन शेतकऱ्यांना देण्यात येणारे कांद्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना गुरूवारी दिली.
नगर दक्षिण मतदारसंघात मोठयाप्रमाणावर जिरायती शेती असून अनेक शेतकऱ्यांचे कांदा हेच पिक आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आ. नीलेश लंके यांचा पाठपुरावा सुरू आहे.
कांद्याचे दर कोसळल्याने आ. नीलेश लंके यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांनी आंदोलन करून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल साडेतिनशे रूपयांचे अनुदान जाहिर केले होते. त्यासाठी पिक पाहणी, बाजार समितीच्या विक्री पट्टया तसेच बँक खात्याचा तपशील बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी सुपूर्द केला होता. चार महिने उलटूनही हेअनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी वर्ग या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
आ.लंके यांनी अजितदादा पवार यांची गुरूवारी मंत्रालयात भेट घेऊन हे अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणी केली. त्यावर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजुर करण्यात आले की तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग होईल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. आ. लंके यांनी अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पारनेर तालुक्यातील ५ हजार ३७३ लाभार्थी बांधवांचे सुमारे ११ कोटी ५७ लाख ४६० रूपये इतके अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. नगर जिल्हयात ४७ हजार ७६२ लाभार्थी शेतकरी असून त्यांचे एकूण १०३ कोटींचे अनुदान प्रतिक्षेत असल्याचे आ. लंके यांनी निवेदनात नमुद केले आहे.
▪️नगर दक्षिणला प्राधान्य द्या
नगर जिल्हयात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले असल्याने विशेषतः जिल्हयाच्या दक्षिण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी दक्षिण भागातील शेतक-यांना हे अनुदान लवकरात लवकर प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे आ. लंके यांनी अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
▪️नगर दक्षिणेतील लाभार्थी (कंसातील आकडे अनुदानाचे) :
शेवगांव ६२६ (७४ लाख १४ हजार २९५), पाथर्डी २०५ (२० लाख ९२५), पारनेर ५ हजार ३७३ (११ कोटी ५७ लाख ४६ हजार ६४), नगर १८ हजार ८९९ (४५ कोटी ११ लाख ६१ हजार ६८६), श्रीगोंदा १ हजार १३० (३ कोटी ७२ लाख ५५ हजार ८६२), कर्जत ७३८ (१ कोटी ४२ लाख ७३ हजार २२०), जामखेड १ हजार ५६९ (३ कोटी ४५ लाख २ हजार ७१६), प्रसन्ना खाजगी मार्केट पाडळीआळे, पारनेर १९७ (५६ लाख ३ हजार १५०)