पारनेर(श्रीकांत चौरे):
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदार संघातील १९ गावांना प्रत्येकी पाच लाखांचे जीम साहित्य मंजुर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
पळशी गावासाठी ओपन जीमचे साहित्य मंजुर झाले असून उर्वरीत १८ गावांसाठी इनडोअर जीम साहित्य उपलब्ध होणार आहे.
▪️इनडोअर जीम साहित्य मंजुर झालेली गावे पुढीलप्रमाणे
म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, अळकुटी, कुरूंद, तिखोल, पळसपुर, काताळवेढा, भोयरेगांगर्डा, नांदूरपठार, हिवरे कोरडा, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर तसेच जखणगांव, खडकी, वाकोडी, नांदगांव शिंगवे, नेप्ती व चास ता. नगर.
आ. नीलेश लंके यांनी सांगितले की, पारनेर-नगर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मतदारांनी दिल्यानंतर मतदारांच्या विश्वासास पात्र राहुन शासनाच्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यावर आपला भर आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकास कामे मिळाली पाहिजेत याचीही काळजी घेण्यात येत असून बहुतांश गावांमध्ये विकासाची गंगा पोहचविण्यात आपणास यश आले आल्याचे ते म्हणाले.
राज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आता अर्थ व नियोजन ही खाते आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघाला निधीची कमतरता भासरणार नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांनी विविध रस्त्यांसाठी तब्बल २९ कोटींचा निधी दिला आहे. अजूनही मोठा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध होणार असून अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचे आपले ध्येय आहे. विकास कामे मार्गी लावताना कोणताही राजकिय अभिनिवेश न बाळगता केवळ विकास हेच आपले ध्येय असल्याचे आ. लंके यांनी स्पष्ट केले.
▪️पारनेरची पाणी योजना लवकरच
पारनेर शहराची महत्वाकांक्षी पाणी योजनाही आता लवकरच मार्गी लागणार आहे. या योजनेची तांत्रीक मंजुरी यापूर्वीच मिळाली असून आता अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रशासकिय मान्यता मिळेल व पारनेरकरांच्या जिव्हाळयाच्या शास्वत पाणी योजनेचे काम मार्गी लागेल असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला. नगरविकास खात्यामार्फत पारनेर शहरातील विविध विकास कामांनाही निधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.