ओतूरचे जय दुर्गाशक्ती महिला लेझीम पथक लक्षवेधी देवीमुर्ती आगमन मिरवणूक धुमधडाक्यात

ओतूर(बापू रसाळे):ओतूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या देवीमुर्तींच्या आगमन मिरवणुकांनी अवघा परिसर दणाणून सोडला होता.ओतूरच्या श्री छत्रपती शिवाजी रोडवरील जय दुर्गाशक्ती नवरात्रोत्सव मंडळाने अत्यंत शिस्तबध्दपणे डी. जे.,डॉल्बी विरहित,पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य आदर्श मिरवणुकीचे आयोजन केले होते.

मिरवणुकीत मंडळातीलच मयुरी रसाळे व जुई पराड यांचे मार्गदर्शनात महिला व मुलींनी महिनाभर सराव करून तयार केलेल्या लेझीम पथकाने नेत्रदीपक केलेल्या कलाकृतीचे सादरीकरण पहाण्यासाठी भाविभक्तांनी मोठी गर्दी केली होती.परिणामी हे महिलांचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. मंडळाने यावर्षी अत्यंत सुबक अशा भव्य व विलोभनीय रेणुकामातेच्या देवी मूर्तीची व घटस्थापना केली असून मोठा उभारलेला शामियाना व त्यावर केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई देविभक्तांना थांबण्यास भाग पाडत आहे.

मंडळाने दैनंदिन दोन्ही वेळची महाआरती,भजन, प्रवचन,देवीची गीते,होम हवन,मंगळा गौर, रासदांडिया,उखाणे स्पर्धा,होम मिनिस्टर,संगीत खुर्ची,हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार बापू रसाळे,अरुण देसाई, अमोल बोऱ्हाडे,अध्यक्ष राजेंद्र शेटे,उपाध्यक्ष अभिनव पाटील डुंबरे,नंदू गीते यांनी दिली.