सर्व धर्म समभाव मेहेराबाद म्हणजे मेहेरप्रेमीची पंढरी

अहमदनगर(महेश कांबळे)जगभरात शांतता नांदावी,माणूसपण जपलं जावं,म्हणून अवतार मेहेरबाबानी आयुष्यभरप्रयत्न केले.३१ जानेवारी हा मेहेरबाबांचा स्मृतिदिन.त्यानिमित्त येथे ३ दिवस मेहेरप्रेमीची पंढरीच भरते व सर्व धर्म समभाव,स्वच्छता काय असते हे जगाला दिसते . 

                 मानवतेला जे अभिप्रेत होतं,त्या गोष्टी मेहेरबाबा कितीतरी आधीपासून इथं करत होते.दीनदलितांची सेवा,कुष्टरुग्णांना आधार,गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा अशी अनेक कामे मेहेर बाबांनी इथे सुरू केली.अरणगाव म्हणजे दुष्काळी गाव.हाताला काम नाही,खायला अन्न नाही अशी अनेकांची स्थिती.मेहेरबाबांनी त्यांच्या भौतिक अडचणी दूर करता करता आध्यात्मिक उन्नतीही केली. मेहेरबाबांचं हे काम अनेक देशात पोहोचलं. 

             अमरतिथी उत्सवासाठी मेहेराबादला गेल्यावर तिथला जनसागर डोळ्यात मावत नव्हता. कोण नव्हतं त्यात? सर्वसामान्य माणसांबरोबर पाश्चिमात्य देशांत कोट्यवधींची उलाढाल असलेले उद्योगपती, बँकर,कलावंत त्यात होते.मेहेराबादमध्ये सगळे समान.कोणी मोठा नाही,कोणी छोटा नाही.सगळी कामं स्वयंसेवकांनी वाटून घेतलेली.कोणी दर्शन व्यवस्थेकडं लक्ष देत होतं,कोणी व्यासपीठावरच्या कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळतं होतं.कुठे गोंधळ नाही, की गडबड नाही. 

            तीन दिवसांत लाखो भाविकांनी मेहेरबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.अमरतिथी हा एका अर्थानं आंतरराष्ट्रीय महोत्सवच झालाय. हजारो लोकांच्या जेवणाची,निवासाची व्यवस्था तिथे करण्यात आली होती.एवढा मोठा उत्सव दुसरीकडे असता,तर कचऱ्याचे,पत्रावळीचे ढीग साचलेले दिसले असते.मेहेराबादच्या टेकडीवर मात्र कागदाचा कपटाही कुठे पडलेला दिसला नाही.काही स्वयंसेवक हातात काठी घेऊन फिरत होते. .या काठीला खालच्या बाजूला टोक होतं. कुठे कागद पडलेला दिसला,तर स्वयंसेवक लगेच काठीनं तो कागद उचलत होते.