मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा योजनेंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी 

आळेफाटा, दि.(डीबी वाळुंज)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान सद्या राज्यभर सुरु असून या उपक्रमामुळे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी एकत्र येऊन राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता, विद्यार्थ्यांना आर्थिक, अशा विविध विषयांवर उपक्रम राबवत असलेमुळे शाळांमधील वातावरण जणू काय बदलून गेले आहे. 

या अभियानात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवध्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आलेअसून क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्व, कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, कचरा व्यवस्थापन, इत्यादी बाबींवर शाळा व्यवस्थापन काम करत असताना दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेत अग्रेसर असणारी अशी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद हि शाळा होय. या शाळेची आज मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमासाठी जिल्हा तपासणी कमिटीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असून या शाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हि शाळा इम्पथी फाउंडेशन, मुंबई जिल्हा परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने उभारली असून यात इम्पथी फाउंडेशन, मुंबई यांचा सिंहाचा वाटा आहे. यात भर घातली ती रोटरी क्लब ऑफ आळेफाटा, सेन्ट्रल, पुण्यातील विविध ठिकाणचे रोटरी क्लब, माजी विद्यार्थी अशा अनेकांच्या सहकार्यातून विकसित झालेली एक अद्ययावत व सुसज्ज्य अशी परिपूर्ण शाळा आहे. 

शाळेची पाहणी करणेसाठी प्रदीप पोटघन, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, बाळकृष्ण वाटेकर, अधिव्याख्याते जिल्हा प्रशिक्षण संस्था, पुणे, विष्णू धोंडगे, विस्तार अधिकारी शिक्षण, पंचायत समिती, जुन्नर, दिनेश मेहेर, केंद्रप्रमुख नारायणगाव यांनी तपासणी कामकाज पाहिले. मुल्यांकन करताना शासनाच्या असणाऱ्या सर्व बाबींची अचूक पाहणी व तपासणी केली. सुसज्ज्य इमारत, आनंदी परिसर, शाळेचा स्वच्ह व सुंदर परिसर, परसबाग, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आंबेमोहराणे बहरलेली आमराई हे सर्व पाहून अधिकारी वर्गाने सर्वांचे कौतुक केले. या तपासणी दरम्यान मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, मनीषा इले, वृषाली कालेकर, संगीता कुदळे,  गौरी डुंबरे, शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ सदस्य डी.बी.वाळूंज हे देखील उपस्थित होते.