अहमदनगर(महेश कांबळे)-तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी,पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे आगमन २७ फेब्रुवारीला अहमदनगर येथे होणार आहे.
शिल्पा गार्डन येथे श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह)सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने जसा नित्य श्री बलार्जीचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो तशाचा तसा सोहळा येथे होणार आहे.
अहमदनगरच्या भाविकांना प्रथमच विवाह सोहळ्याची अतिदुर्लभ पर्वणी यानिमित्त मिळणार आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.हजारो भाविकांची दर्शनाची सोय करण्यात आली असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक व तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारशी बोलताना सांगितले.
यावेळी नियोजन समितीचे संजय ताथेड,अनिल लुंकड, किरण राका,अजित बोथरा,अमित मुथा,आशिष खंडेलवाल, पियुष मुथा,सुधीर मुनोत, अभिजित कोठारी,सिए. रवींद्र कटारिया,महेश गुगळे,धनेश कोठारी यांच्या उपस्थितीत सौरभ बोरा म्हणाले,यानिमित्ताने भव्यदिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २७ फेब्रु रोजी सायं ६ वा देवाच्या विवाह सुरवात होणार असून सुमारे २ तासाचा हा धार्मिक विधी आहे. या सोहळ्याच्या पौरोहित्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानचे ७० पुजारी येणार आहेत.तत्पूर्वी दु ४ वा बडीसाजन मंगल कार्यलय ते शिल्पा गार्डन दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आकर्षक भव्य रथात श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्या ठेवण्यात येणार आहेत.या शोभायात्रेत उंट,घोडे,ढोलपथक,लेझीम पथक, दांडिया पथक, तुलसी वृंदावन व मंगल कलश घेतलेल्या महिलासह दक्षिण भारतातील पारंपरिक वाद्यवृन्दांच्या पथकाचा समावेश असणार आहे.यात मोठ्या संख्यने नागरिक व महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
हा सोहळा सर्वाना पहाता यावा यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.गाड्यांच्या पर्किगीची व्यवस्था तसेच भाविकांना तिरुपती देवस्थानचा लाडू प्रसाद व विवाह सोहळ्यानंतर पोंगल प्रसाद मिळणारआहे.