निमगावसावा येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील प्रमुख गाव असलेल्या निमगावसावा येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय व्हावे,अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

सध्या निमगावसावा, बोरी बु., बेल्हे आदी परिसरातील वीजग्राहकांना सर्व कामांसाठी नारायणगाव अथवा आळेफाटा येथील महावितरण कार्यालयात जावे लागते. यासाठी २५ ते ४० किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

निमगावसावा येथे उपविभागीय कार्यालय झाल्यास सुमारे २५ ते ३० गावांतील वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. वीजबिल, नवीन कनेक्शन, तक्रारी, तांत्रिक कामे यासाठी ग्राहकांना सहजतेने सेवा मिळू शकेल.

पांडुरंग पवार यांनी सादर केलेल्या निवेदनात, ग्राहकांच्या सोयीसाठी निमगावसावा येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.