निमगावसावा येथे 220 केव्ही क्षमतेचे नवे पॉवर हाऊसची मागणी

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथे लवकरच 220 केव्ही क्षमतेचे नवे पॉवर हाऊस उभारण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग तुकाराम पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निमगावसावा हे जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर तालुक्यांच्या सीमेजवळील, तसेच प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. या परिसरातील शिरोली,खोडद, राजुरी,पिंपरखेड, पारगाव, बेल्हे, औरंगपुर, झापवाडी यांसारख्या गावे 33/11 केव्ही क्षमतेच्या पॉवर हाऊसवर अवलंबून आहेत. मात्र, वीज पुरवठ्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मागणी पूर्ण करण्यासाठी 220 केव्ही क्षमतेचे नवे पॉवर हाऊस उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पॉवर हाऊससाठी आवश्यक असणारी 10 एकर जागा देण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायतीने घेतला असून, उभारणीसाठी कोणतीही अडचण राहिलेली नाही. हे पॉवर हाऊस उभारल्यास तालुक्यातील सुमारे 40 ते 50 गावांना स्थिर व पुरेसा वीज पुरवठा होणार आहे.

या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, लघुउद्योग तसेच घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगपासून मुक्तता मिळेल, तसेच कृषीपंपधारकांना पुरेसा वीज पुरवठा मिळून शेती उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला.त्यांच्या पुढाकारामुळेच हा महत्त्वाचा निर्णय प्रक्रियेत आला असून, पुढील काही महिन्यांत या पॉवर हाऊसच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.