सोलापूर : माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य वृक्षदिंडीने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा शर्यत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कृषी सप्ताहाच्या निमित्ताने कृषीकन्या आरती आमले, ढगे अक्षता,पायल खेतमालस, आयशा मुंडे,सानिका पुराणे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागात हरितक्रांती घडवून आणणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या योगदानाची विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषीकन्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कृषी दिन अविस्मरणीय ठरल्याचे चित्र शेलगावात पाहायला मिळाले.