आणे :-सरदार पटेल हायस्कूल, आणे येथे शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञतेची अनोखी अभिव्यक्ती केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना जास्वंदाची रोपे भेट देत “हरित संदेश” दिला. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. रविंद्र जाधव हे होते.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत वर्गात अध्यापन केले व अध्यापनाचा अनुभव घेतला. “विद्यार्थ्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून तो शिक्षक-विद्यार्थी नात्याला बळकट करणारा आहे,” असे मुख्याध्यापक श्री. धोंडिभाऊ शिंदे यांनी सांगितले.
यावर्षी पाच सप्टेंबरचा शिक्षक दिन आणि सात सप्टेंबरचा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन असा दुग्धशर्करा योग जुळल्याने विद्यालयात विविध सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवाचे सोने झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीचा “मुख्याध्यापक-विद्यार्थी” धीरज दाते याने केले तर आभार प्रदर्शन पूर्वा दाते हिने मानले.