मंचर : लहानपणापासून मुलांना योग्य संस्कार व संस्कृतीचे ज्ञान मिळाले, तर ते आदर्श नागरिक घडू शकतात. भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाची शिकवण ही आजच्या काळाची मूलभूत गरज आहे असे प्रतिपादन प्रा. शरद घोडेकर यांनी केले.
श्री गणेश फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी दत्तात्रय वायकर तर मुख्याध्यापिका विना फदाले उपस्थित होते. प्रा. जगन्नाथ टेके, दीपक वायकर, बाळासाहेब सद, सुरेंद्र डोके, रविकिरण डोंगरे, गोरक्ष फुलसुंदर, शितल चासकर, परविन मुंडे, गोरक्षनाथ कराळे, कामठे सर, गायकवाड सर आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.घोडेकर म्हणाले, “हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगाचा उपभोग घेण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे. संस्काराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे धडे आई-वडील व शिक्षकांनी सतत विद्यार्थ्यांना द्यायला हवेत. भारतभूमी ही सुजलाम-सुफलाम आहे. तिचे रक्षण आपल्याच हातात आहे.”
“ज्याप्रमाणे मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान व शेतकरी हे दोन घटक महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे गाव व देशाची संस्कृती जपण्याची जबाबदारी तरुणांची आहे. शाळेतूनच देशप्रेम व बंधुभावाची शिकवण दिली तर ती मुले आयुष्यभर या मूल्यांना जपतील.”
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी गाव, परिसर व शाळा स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.