वडगाव आनंद शाळेची कळमजाई सहल:नवरात्र परंपरेची विद्यार्थ्यांना माहिती

आळेफाटा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद यांच्या वतीने शैक्षणिक व परिसर भेट सहल आयोजित करण्यात आली होती. शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या पुढाकाराने ही सहल निसर्गरम्य कळमजाई मंदिर (गव्हाळा डोंगर पठारावर) येथे घेण्यात आली.

नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून देवीचे दर्शन घेणे हा मुख्य उद्देश होता. मात्र यासोबतच विद्यार्थ्यांना नवरात्रीतील परंपरा, देवीच्या घटस्थापनेमागील शास्त्रीय कारणे तसेच पुणे जिल्ह्यातून तुळजापूर भवानीमातेच्या मंदिरासाठी जाणाऱ्या मानाच्या पलंगाची तयारी आणि प्रवास याविषयीही माहिती देण्यात आली. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांतून मानाचा समजला जाणारा हा पलंग दरवर्षी वडगाव आनंद मार्गे जातो, याची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिली.

सहल अधिक संस्मरणीय होण्यासाठी मान्यवरांनी सहकार्य केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील व शिक्षण तज्ञ डी. बी. नाना वाळुंज यांच्या विनंतीनुसार दोन बसची व्यवस्था माननीय दीपक शिंदे यांनी केली. मुलांसाठी खाऊची व्यवस्था शाळेचे माजी विद्यार्थी व संचालक विविध कार्यकारी सोसायटी सुरेश बबन चौगुले यांनी केली. तर ग्रामपंचायत सदस्य संतोष पादिर यांनी राजगिऱ्याचे लाडू दिले. पिण्याच्या पाण्याची सोय विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सचिन वाळुंज यांनी केली. भेळ शाळेतील शिक्षकांनी स्वतः दिली. बसवरील फ्लेक्सची व्यवस्था आळेफाटा येथील उद्योजक मनोज रासकर यांनी केली.

या सहलीत मुख्याध्यापक सुनील ठीकेकर यांच्यासह शिक्षक वृषाली कालेकर, संगीता कुदळे, मनीषा इले, गौरी डुंबरे यांनी सहकार्य केले. समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, शिक्षण तज्ञ डी. बी. वाळुंज व गावातील ज्येष्ठ नागरिक बबन दादा देवकर यांनीही सहभाग नोंदवला. बस चालक अनिल तळपे, आदित्य वामन व शांताराम गाडगे यांच्या मदतीने सहल सुरळीत पार पडली.