‘कोणी घर देता का घर ?’

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यातील अनेक गावात गोरगरीब काबाडकष्ट करुन खाणाऱ्या कुटुंबियांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि मतदान यादीत संबंधित गावात गोरगरीबांचे नावे असतानाही अनेक गोरगरीब अशिक्षित लोक शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासनाचा हक्काचा निवारा तरी नेमका कधी मिळणार? असा संतप्त सवाल शासनाच्या घरकुल यादीत नावे असतानाही ज्यांना अद्याप घरकुले मिळालेली नाहीत, अशा वंचित घटकांकडून केला जात आहे. त्यामुळे लाभार्थी असूनही कोणी ‘घर देता का घर’ अशी शासन दरबारी याचना करण्याची वेळ बेघरांवर आली आहे.

तालुक्यातील आणे,बेल्हे,राजुरी गावासह अनेक गावात अशा लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी असल्याचे दिसून येत आहे. गोरगरीब मोलमजुरी करुन आपली उपजिविका चालविणारे दररोज काबाडकष्ट करत असताना त्यांना शासनाचा निवारा घरकुल यादीच नाव असतानाही नेमका कधी मिळणार? अशी आर्तहाकही गोरगरीबांकडून मारली जात आहे.

मात्र,आंधळे-बहिरेपणाचे सोंग घेणाऱ्या पंचायत समिती घरकुल विभागातील अधिकाऱ्यांना गोरगरीबांचा आक्रोश ऐकू येणार का? असा सवाल शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असणाऱ्या गोरगरीबांकडून उपस्थित केला जात आहे.

अनेक लाभार्थी शासनाच्या घरकुल यादीत असताना आणि त्यांची नावेही यादीत आलेले असतानाही गावपुढारी मात्र, आपल्या हेकेखोरवृत्तीतून गोरगरीबांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन हकनाक पंचायत समितीचे दारे झिजवायला लावत असल्याचे दुर्देवी चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विधवा,विधूर व घटस्फोटीत महिलांसह गोरगरीब लोक शासनाच्या घरकुल योजनेत समावेश होऊनही प्रत्यक्षात त्यांना मात्र, घरकुल योजनेच्या लाभापासून चारहात लांबच आहेत.

गावपुढाऱ्यांच्या तालावर ग्रामसेवक नाचत असल्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ देणारे गावपुढारीच गोरगरीबांना हाकनाक त्रास देऊन उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील जनतेतून गावपुढारी व ग्रामसेवकांच्या विरोधात स्पष्टपणे करत असताना याचा बोध वरिष्ठ अधिकारी घेणार का? असा संतप्त सवालही व्यक्त होत आहे.