शिरूर लोकसभेसाठी खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

सुरेश भुजबळ

पुणे:राष्ट्रवादीच्या फुटीपासून चर्चेत असलेल्या शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

जयंत पाटलांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा निश्चय मेळावा आणि भोसरी विधानसभेची आढावा बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारी जाहीर केली.

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या फुटी पासूनच चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला.जयंत पाटील यांनी निश्चय मेळाव्यात त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे.तर दुसरीकडे,अजित पवारांनी अमोल कोल्हें विरोधात थेट दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं विधान करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे.

यानंतर अजित पवार यांना कोल्हे यांनी सुद्धा प्रत्युत्तर देत डिवचले होते. सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडत आहे. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होते का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला होता.

सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं कोल्हे यांनी म्हटले होते.

अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हे यांना थेट आव्हान देणाऱ्या अजित पवार हे कोणता चेहरा समोर आणणार याकडे शिरूर लोकसभेतील मतदारांचे लक्ष लागले आहे