मंगरूळ(ता.जुन्नर)येथे विद्युत पंपाच्या केबल चोरीत वाढ–शेतकरी त्रस्त, पोलिसांकडून लक्ष अपेक्षित

मंगरूळ(प्रतिनिधी)मंगरूळ(ता.जुन्नर)येथील शेतकरी सध्या विद्युत पंपाच्या केबल चोरीच्या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे चिंतेत आहेत.गावासह परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या काही दिवसांत बळी पडल्या असून या प्रकारामुळे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सिंचन व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.

गावठाण आणि नेहरमळा शिवारातील चंद्रकांत ढगे, निलेश लामखडे,दत्ता लामखडे,प्रवीण भळगट,संजय गाजरे,दत्तू लामखडे,बाबाजी गुंजाळ,श्रावण नडे,बाळू खुटाळ,धोंडीभाऊ लामखडे,सुनील वाजे,संजय खिलारी, सावळेराम लामखडे,गोरक्ष लामखडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या विद्युतपंपाची केबल चोरट्यांनी गुरुवारी पहाटे लंपास केली.

शेतकरी वीजपंपासाठी हजारो रुपये खर्च करून केबल टाकतात. मात्र अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस केबल चोरी करून शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आणली आहे.

या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे सिंचन काम ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या असल्या तरीही अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे चोरटे बिनधास्तपणे पुन्हा पुन्हा केबल चोरी करत आहेत.

गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे अधिक सक्रियतेने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, रात्री गस्त वाढवून गावात सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,”एक केबल काढण्यासाठी १० ते १५ हजार रुपये लागतात.सतत चोरी होत असल्याने आर्थिक नुकसान होऊन शेती करणे कठीण झाले आहे.”