कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील संथ कामामुळे अपघातांचा धोका वाढला

बेल्हे,दि.२३ (प्रतिनिधी) : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील सुरू असलेले सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून कामाच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था न केल्यामुळे महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. अल्प अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासन्तास अडकून राहावे लागत असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गुंजाळवाडी फाटा (बेल्हे) येथे कालच अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडला. एका टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले.


नागरिकांची प्रतिक्रिया

महामार्गावरील कामकाजाच्या संथ गतीमुळे व अयोग्य नियोजनामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

“या महामार्गावरील कामामुळे आमची रोजची दिनचर्या विस्कळीत झाली आहे. पूर्वी १५ मिनिटांत पार होणारा रस्ता आता तासभर लागतो. पर्यायी रस्त्यांची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे कोंडी आणि अपघात दोन्ही वाढले आहेत.” – संजय बोरचटे, स्थानिक रहिवासी

“वाहनचालकांना दररोज मानसिक ताण सहन करावा लागतो. प्रवासाची वेळ दुप्पट होत आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षितता सुनिश्चित केली नाही, तर मोठ्या दुर्घटना घडणे अटळ आहे.” – रामा गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते, गुंजाळवाडी


नागरिकांची अपेक्षा

स्थानिकांचा ठाम पवित्रा आहे की महामार्गावरील काम जलदगतीने पूर्ण व्हावे आणि प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा गंभीर परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.