शिरूर(प्रतिनिधी) : अष्टविनायक महामार्गावर मलठण ते कवठे यमाईदरम्यान वारंवार अपघात होत आहेत. बुधवारी सकाळी आणखी एक अपघात घडला. पहाटे साडेसहाच्या सुमारास मलठण येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात महिंद्रा पिकअप वाहन उलटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख किरण देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढले. तसेच दत्ता गडदरे व काही तरुणांनी मिळून पलटी झालेलं वाहन सरळ उभं केलं.
गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अष्टविनायक मार्गावरून मोठमोठी मालवाहतूक वाहने व एमआयडीसीतील ट्रक अतिवेगाने धावत असतात. गतीरोधक नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने गेल्या चार महिन्यांत या रस्त्याची कोणतीही पाहणी केलेली नाही.“या महामार्गावर तातडीने गतीरोधक टाकावेत; अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा शिरूर तालुका लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रशांत श्रावण साळवे यांनी दिला आहे.