जुन्नर(प्रतिनिधी):सोमतवाडी शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत विघ्नहर मेडिकल फाऊन्डेशन नारायणगावच्यावतीने शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पांतर्गत सर्पदंश प्रतिबंध,प्रथमोपचार, उपचार, जनजागृती अभियानाअंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंश जनजागृती अंतर्गत माहितीपट दाखविण्यात आला.यावेळी डॉ.सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सदानंद राऊत यांनी विद्यार्थ्यांना जगात तसेच भारतामध्ये होणाऱ्या सर्पदंशाची माहिती सांगितली.
जगाच्या तुलनेत भारतातील सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचा वाढीव दर याविषयी सविस्तर माहिती दिली.सर्पदंश टाळता येऊ शकतो,त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे ;सर्पदंश झाल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती दिली.
डॉ.राऊत यांनी विषारी साप नाग ,मण्यार ,घोणस फुरसे हे विषारी साप चावल्यामुळे शरीरावर कोणते कोणते परिणाम होतात हे सांगितले.ग्रामीण, डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशा वेळी सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वेळेत योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सदानंद राऊत यांनी केले.
डॉ.पल्लवी राऊत मॅडम यांनी बिनविषारी सापांचे प्रकार स्पष्ट केले व ते कोठे आढळतात , विषारी साप व बिनविषारी साप ओळखण्याची लक्षणे ,सर्पदंशाची लक्षणे कोणती असतात त्याचप्रमाणे सर्पदंशावरील उपचार याविषयी माहिती दिली. सर्पदंश झाल्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय घेतले पाहिजेत , सर्पदंशावर प्रथमोपचार कोणते करावे,आवळपट्टी कशी बांधायची ,आता जे नवीन संशोधन आले त्यातील स्मार्ट बँडेज कशा पद्धतीने बांधायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी सर्पदंश होऊ नये म्हणून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी ही माहिती दिली.
प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी श्री दत्ता गवारी, डॉ.सुप्रिया,डॉ.जगदाळे,अशोक लांडे,यश मस्करे , प्राचार्य विलास साबळे उपस्थित होते.