बेल्हे : पीजी’च्या परीक्षेसाठी रीतसर रजा घेतली खरी,पण सरकारने परीक्षा रद्द केल्याने,त्या सुट्टीच्या दिवशी रुग्णांना सेवा देत डॉक्टरने सेवाभावीवृत्ती जपल्याचे चित्र रविवारी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात पहावयास मिळाले.
रीतसर सुट्टी घेतली अथवा साप्ताहिक सुट्टी असेल तर शासकीय रुग्णालयात शक्यतो डॉक्टर,आरोग्य कर्मचारी रुग्ण सेवेसाठी रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होत नाहीत,हा अनुभव आपल्यासाठी नवीन नाही.पण बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात याउलट परस्थिती पहावयास मिळत आहे.

बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांची पीजी’ची परीक्षा रविवारी २३ जून रोजी होणार असल्याने,डॉ.फड यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रीतसर दोन दिवस आधी रजा घेतली होती.पण सरकारने दि.२३ रोजी होणाऱ्या पीजी’च्या परीक्षेला स्थगिती देऊन पुढे ढककली असल्याचे दि.२२ रोजी रात्री दहा वाजता जाहीर केले.
पीजी’ची परीक्षा रद्द झाली म्हणून रीतसर सुट्टी’च्या दिवशी कुटुंबा सह कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड यांनी रजेच्या दिवशी रविवारी दिवसभर आरोग्य केंद्रात उपस्थित राहून रुग्णांची सेवा केली.
नेमका याच दिवशी तालुका आरोग्य प्रशासनाने,१८महिलां च्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.डॉ.फड त्या शिबिरातील डॉ.अशोक मुंढे यांच्या पथकात सहभागी झालेच पण त्यादिवशी आलेल्या गरोदर महिलेची प्रसूतीही त्यांनी केली.त्यानंतर दिवसभर रुग्णांना सेवा दिली.