राजुरीच्या हिंदू- मुस्लीम एकोप्याचा चांद्रयान उड्डाण मोहिमेत प्रत्ययअग्निसुरक्षेसह विलगीकरणाच्या प्रणालीत मयुरेश- आसिफ जोडगोळीचे योगदान

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)भारतासाठी अभिमान मोहीम बनलेल्या असलेल्या चांद्रयान ३च्या प्रक्षेपणाला राजुरीतल्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचे इंधन लाभले आहेत.

राजुरी येतील असिफभाई महालदार यांचे निवास

चांद्रयान प्रक्षेपकाच्या प्रज्वलन आणि विलगीकरण प्रणालीची महत्वपूर्ण कामगीरी मूळ(राजुरी)ता जुन्नर येथील आणि सध्या इस्रोत कार्यरत अभियंता मयुरेश शेटे आणि मुस्लिम युवक आसिफ भाई महालदार या जोडगोळीला लिलया पार पाडता आली.त्यामुळे राजुरीच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याला अनोखे बळ मिळाले आहे.

मयुरेश शेटे यांनी शिक्षण घेतलेली राजुरीतील हीच ती शाळा

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावचे एकत्रित कुटुंबातील सदस्य असलेले आणि जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य कैलास शेटे यांचे सुपुत्र मयुरेश शेटे हे सध्या इस्रोत कार्यरत अभियंता आहेत.मयुरेश शेटे यांनी त्यांचे शालेय शिक्षण विद्या विकास मंदिर विद्यालयात राजुरी येथे पूर्ण केले आहे.त्यानंतर पुण्यातील एमआयटीतून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर,इस्त्रोच्या माध्यमातून त्याने आयआयटी बेंगलोर मधून पुढील शिक्षण पुर्ण केले. गेल्या १४ वर्षांपासून तो इस्त्रोत प्रणाली अभियंता म्हणून कार्यरत आहे.यापूर्वी चांद्रयान,गगनयान,आणि मंगळयान मोहीमेतही त्याने कामगीरी केली आहे.तर राजुरी येथील सामान्य मुस्लिम कुटुंबातील ट्रक चालकाचे चिरंजीव असलेल्या असिफभाई महालदार यांनी मुंबई येथे उदयोग व्यवसायाच्या माध्यमातून उदोजक म्हणून उदयास आले.

मयुरेश शेटे

उदोजक आसिफ महालदार यांच्या रिलायन्स अग्निसुरक्षा प्रणाली कंपनीला चांद्रयान ३ मोहीमेतील प्रक्षेपण प्रणालीत अग्निसुरक्षा पंपांची उभारणी,स्प्रींक्लर प्रणालीची उभारणी, आय वॉश,बॉडी शॉवर्स उभारणी आणि छोटे अग्निशमन उपकरणांच्या रचना उभारण्यासाठीचे ५ कोटी ६५ लाख ३० हजार रुपये खर्चाचे कंत्राट मिळाले होते.कोरोना मुळे अग्निशमन उपकरणांच्या कामास अडथळे निर्माण झाले, अडथळे दूर करत काम पूर्ण केले.देशासाठी अभिमान असलेल्या चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाच्या अग्निसुरक्षेचे काम मिळाले याचा खूप अभिमान असल्याचे महालदार यांनी सांगितले.

पेमगिरी येथील मयुरेश शेटे यांचे कुटुंब

राष्ट्रासाठी अभिमान असलेल्या मोहीमेचा एक घटक होता आल्याचा खूप आनंद झाल्याचे असिफभाई महालदार यांनी सांगितले.तर मुलाने राष्ट्रासाठी केलेल्या कामगिरीने माझ्या कर्मभूमी असलेल्या राजुरी आणि माजी जन्मभूमी असलेल्या पेमगिरी गावचा विज्ञान क्षेत्रातही मानाचा तुरा लागला,याचा सर्वात मोठा आनंद आणि त्यात माझा मुलगा मयुरेश असल्याचा सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया मयुरेश चे वडील सेवानिवृत्त प्राचार्य कैलास शेटे यांनी बोलताना दिली.

आसिफभाई महालदार

अग्निसुरक्षेसह विलगीकरणाच्या प्रणालीत मयुरेश शेटे आणि आसिफभाई महालदार या जोडगोळीच्या योगदानाने राजुरी गावच्या हिंदू-मुस्लीम एकोप्याचा चांद्रयान उड्डाण मोहिमेत प्रत्यय देशातील जनतेला आला असल्याचे माजी सभापती दीपक आवटे यांनी सांगितले.

आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे राजुरी गावच्या विद्या विकास मंदिर विद्यालयात कायम चर्चेत राहिलेल्या मयुरेश कैलास शेटे यांनी विद्यालयाच्या नावाचा डंका देशात वाजवला.तर आमचे मित्र उदोजक असिफभाई महालदार यांच्या कंपनीच्या योगदानाने राजुरी गावचे नाव देशाच्या विज्ञान क्षेत्रातही पोहचले याचा सार्थ अभिमान वाटतो असे मत विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य जीके औटी यांनी व्यक्त केले.