सुरेश भुजबळ
विद्यार्थ्यांचे भविष्य केवळ शिक्षणानेच घडते,पण शिक्षण मानवी मूल्यांची जोपासना करणारे हवे असे प्रतिपादन पद्मविभूषण वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी आळे येथे केले.
आळे(ता.जुन्नर)येथील ज्ञान भारती प्रबोधिनी पुरस्कृत अभ्यासिका ,वसतिगृह ,नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन स्वयं प्रेरणा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी खा.डॉ.अमोल कोल्हे,आ.अतुल बेनके,कोल्हापुर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव(विधी विधान) सतिष वाघोले,राज्याचे मानवी हक्क आयोगाचे सचिव दिलीप गावडे,महाराष्ट लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे,अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, तहसिलदार रविंद्र सबनीस,अशोक घोडके,बन्सीलाल वाचचौरे,बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.माशेलकर म्हणाले की आपल्या आईने आपल्याला खऱ्या अर्थाने घडविले हे सांगतानाच सध्याच्या काळात पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या भविष्याविषयी उच्च आकांक्षा रुजवायला हव्यात तसेच आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केवळ आणि केवळ आपल्या ध्येयावरच केंद्रित करायला हवे व विद्यार्थ्यांनी आयुष्यात केव्हाही अल्पसंतुष्ट असता कामा नये आपण नेहमी महत्त्वाकांक्षी असले पाहिजे असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी बचत असताना प्रवास कितीही लांबचा असला तरी सुरुवात पहिल्या पावलांनी होते ते पाऊल टाकायला विसरू नका असे मत खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त करून माणुस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या मातीला कधीही विसरू नये हे सांगायला विसरले नाहीत.
यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या प्रथमेश ताम्हाणे,दिपक शेलार,अमोल डोंगरे,गोरक्ष गाजरे, गणेश खुटाळ,सिध्दार्थ गुंजाळ या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात राज्यांचे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची माहिती मिळावी यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे सांगत स्पर्धात्मक परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत असे म्हणाले.
सात तालुक्यातील १३२ महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाराष्ट्र शासनाचे सेंद्रिय शेती धोरण समितीचे सदस्य डॉ.संतोष सहाणे यांनी केले व आभार ॲड.क्षमिता पाटील भुजबळ यांनी मानले.