नांदूरचे विद्यार्थी गिरवणार सीबीएसई अभ्यासक्रमाचे धडे !

नांदूरपठार(प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी या हेतूने खासदार नीलेश लंके यांचे स्विय सहाय्यक तथा नांदूरपठारचे सरपंच संदीप चौधरी यांनी मुलगा विश्वजीत याच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी स्कुलमधील विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांची भेट देत आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. या शाळेतील विद्यार्थी आता सेमी इंग्रजीबरोबरच सीबीएसई अभ्यासक्रमाचेही धडे गिरवणार आहेत.

मुलाचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा रूढ होत असताना चौधरी परिवाराने शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरेल असा उपक्रम हाती घेतल्याने परिवाराचे कौतुक करण्यात येत आहे. इयत्ता बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश परिक्षेत मागे पडतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पायापासूनच तयारी व्हावी या उदात्त हेतूने चौधरी परिवाराने शाळेतील केजी पासून इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्याक्रमाची पुस्तके भेट दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांबरोबरच वर्कबुकचेही वितरण करण्यात आले.

▪️खा. लंके यांचा आदर्श

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवू शकतात हे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आजवर सिध्द करून दाखविले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मिळावे, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची त्यांची तयारी पायापासूनच व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. खासदार नीलेश लंके हे शिक्षणासाठी नेहमीच प्राधान्य देतात. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. स्पर्धा परीक्षांसाठीही त्यांची मदत असते. शिक्षणाला महत्व देणाऱ्या खा. नीलेश लंके यांचा आदर्श घेउन आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

संदीप चौधरी
श्रामीणी संदीप चौधरी
सरपंच, नांदूरपठार

▪️परिपुर्ण शाळा

नांदूरपठार येथील जिल्हा परिषदेची शाळा परिपूर्ण आहे. खा. नीलेश लंके यांनी शाळा तसेच अंगवाडीसाठी इमारत, राणी लंके यांनी सुसज्ज शौचालय व संरक्षण भिंतीसाठी निधी दिला असून शाळेसाठी आवष्यक त्या सर्व सुविधा शाळेत उपलब्ध आहेत.