नेतृत्व हरपलं आणि सत्तातर झालं! बेल्हेतील दोन प्रमुख संस्थांवर विरोधकांचा कब्जा

बेल्हे,सुरेशभुजबळ:-बेल्हे गावात प्रस्थापित गटाचा गड ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बेल्हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलचे कैलास औटी यांनी विजय मिळवत प्रस्थापित गटाच्या काशिनाथ गुंजाळ यांचा पराभव केला.

जुन्नर येथे सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत प्रस्थापित गटाकडे १७ पैकी तब्बल १० संचालकांचे बहुमत असतानाही, उपाध्यक्षपदाची निवडणूक दोन गद्दार संचालकांच्या मतांमुळे विरोधकांकडे गेली. औटी यांना ९ तर गुंजाळ यांना ७ मते मिळाली.

ग्रामनेते स्व. रामभाऊशेठ बोरचटे आणि लोकनियुक्त सरपंच स्व. राजाभाऊ गुंजाळ यांच्या निधनानंतर गावातील राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीतही बहुमत असलेल्या प्रस्थापित गटाला पराभव पत्करावा लागला असून, विरोधकांचा तरुण चेहरा गोरक्षनाथ (गोट्याभाऊ) वाघ सरपंचपदी विराजमान झाला आहे.

सलग दोन संस्थांवर सत्ता गमावल्याने प्रस्थापित नेतृत्वावर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. “नेतृत्वावरचा विश्वास कमी झाला का? की नेतृत्वानेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही?” असा सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

गावातील या सलग दोन सत्ताबदलांमुळे बेल्हेच्या राजकारणात नव्या उलथापालथीला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत असून, पुढील निवडणुकीपर्यंत स्थानिक राजकीय समीकरणे अजून तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.