जुन्नर : जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेले बेकायदेशीर कत्तलखाने सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून गंभीर समस्या निर्माण करत असून, हे कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी जिल्हाधिकारी पुणे मा. श्री. जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अलिकडच्या काळात कत्तलखान्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम, पर्यावरणाची हानी, धार्मिक भावना दुखावल्या जाणे, तसेच कायद्याचे सर्रास उल्लंघन असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा सर्व बेकायदेशीर कत्तलखान्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष गणेशभाऊ कवडे, विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसार जिल्हा प्रमुख .हर्षवर्धन कुऱ्हे, बेल्हे गावचे उपसरपंच राजू पिंगट, बजरंग दलाचे सहसंघटक संकल्प विश्वासराव,शंकर शिंदे (विश्व हिंदू परिषद शाखाध्यक्ष), डॉ. दत्ता खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी व जुन्नर तालुका कत्तलखाना-मुक्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.