रेनवडी:-जुन्नर व पारनेर तालुक्यातील रेनवडी-पिंपरीकावळ दरम्यान कुकडी नदीवर सन १९९५ साली बांधण्यात आलेला कोल्हापुर पद्धतीचा बंधारा दुरुस्तीअभावी धोकादायक स्थितीत पोहचला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे.
या बंधाऱ्यामुळे पिंपरीकावळ, पारगाव तर्फे आळे, मंगरुळ, रेनवडी आदी गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा झाला आहे. तसेच या बंधाऱ्यावरून जाणारा रस्ता पुणे व अहमदनगर परिसरातील ग्रामस्थांसाठी सोयीचा ठरला आहे.
तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही काठावरील भरावा वाहून गेला आहे. पुलावरील रेलिंगसुद्धा तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी प्रतिनिधी पांडुरंग पवार यांनी कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले यांच्याकडे पत्राद्वारे योग्य ती उपाययोजना करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे.